New Composition Scheme for Retailers
किरकोळ विक्रेत्यांसाठी नवी आपसमेळ योजना
आपल्याला माहित आहेच की उपहारगृह, बेकरी, किरकोळ विक्रेते, जुन्या वाहनांचे विक्रेते या व्यापाऱ्यांसाठी आपसमेळ योजना आहेत.
आता दिनांक १ ऑक्टोबर २०१४ पासून किरकोळ विक्रेत्यांसाठीची जुनी आपसमेळ योजना रद्द करण्यात आली असून त्या ऐवजी एक नवी सोपी अधिक सुटसुटीत आपसमेळ योजना राज्य शासनाने दिनांक २१-८-२०१४ रोजी अधिसूचना काढून जारी केली आहे.
या नव्या आपसमेळ योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:
1. दिनांक १-१०-२०१४ पासून किरकोळ विक्रेत्यांसाठी असलेली आपस मेळ योजना रद्द होईल. जुन्या आपस मेळ योजनेचा लाभ घेत असलेल्या व्यापाऱ्यांना जर नवी आपस मेळ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना नमुना 4A मध्ये दिनांक ३१-१०-२०१४ पर्यंत अर्ज करावा लागेल. हा अर्ज विभागाच्या सन्केतस्थळावर करायचा आहे. अर्ज न केल्यास नव्या आपसमेळ योजनेचा लाभ मिळणार नाही व व्यापाऱ्यास सर्वसाधारण व्यापाऱ्याप्रमाणे कर भरावा लागेल.
2. व्यापारी नोंदीत असला पाहिजे.
3. व्यापारी उत्पादक अथवा आयातदार नसावा.
4. नवीन आपसमेळ योजनेनुसार व्यापाऱ्यांना आपसमेळ रक्कम भरण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या पर्यायानुसार विक्रीच्या संपूर्ण उलाढालीवर (कर मुक्त वस्तूंवर देखील) १% दराने भरणा करणे अथवा दुसऱ्या पर्यायानुसार फक्त कर-पात्र मालाच्या विक्री उलाढालीवर १.५% दराने भरणा करणे. व्यापारी हा पर्याय विवरण-निहाय निवडू शकतो.
5. या व्यापाऱ्यांचे विवरण सहामाही असेल.
6. व्यापाऱ्याची मागील वर्षाची विक्री उलाढाल रुपये ५० लाखापेक्षा अधिक नसावी.
7. ज्या मालाच्या विक्रीसाठी व्यापारी आपसमेळ योजनेचा लाभ घेत असेल अशा मालाच्या खरेदीवरील कराची वजावट मिळणार नाही.
8. व्यापाऱ्याने करपात्र मालाची खरेदी नोंदीत व्यापाऱ्याकडूनच केलेली असावी. करमुक्त मालाची खरेदी अनोंदीत व्यापाऱ्याकडून असेल तर चालेल. तसेच जर फेरविक्रीच्या मालाचे आवेष्टन साहित्य (packing materials)अनोंदीत व्यापाऱ्याकडून असेल तरी चालेल.
9. व्यापाऱ्यास कर/आपसमेळ रक्कम गोळा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच व्यापारी कर बीजक(Tax Invoice) देखील देऊ शकत नाही.
10. या वर्षी (२०१४-१५)नवीन आपसमेळ योजनेचा लाभ फक्त जुन्या आपसमेळ योजनेतील व्यापारी व सहामाही विवरणपत्र दाखल करणारे व्यापारीच घेऊ शकतील. पुढील वर्षापासून सर्व पात्र व्यापारी लाभ घेऊ शकतात.
11. पुढील वर्षापासून आपसमेळ योजनेचा अर्ज दिनांक ३० एप्रिल पर्यंत करणे अनिवार्य असेल व अशा व्यापाऱ्यास लाभ १ एप्रिल पासून मिळेल.
12. आपस मेळ योजनेतून बाहेर पडायची इच्छा असल्यास नमुना 4B चा अर्ज संकेत स्थळावर दिनांक ३० एप्रिल पूर्वी करावा लागेल. मात्र अटीचे उल्लंघन करणारा व्यापारी अटीचे उल्लंघन केल्याच्या दिनांकापासून आपसमेळ योजनेच्या लाभापासून वंचित होईल.
13. आपस मेळ योजनेच्या व्यापाऱ्यास त्याच्याकडे असलेल्या शिल्लक साठ्यावर असलेल्या मालाच्या खरेदीवरील घेतलेल्या वजावटीची (set off) रक्कम भरावी लागेल. त्या उलट जो आपसमेळ व्यापारी योजनेतून बाहेर पडत असेल अशा व्यापाऱ्यास मालाच्या शिल्लक साठ्यावर कराची वजावट (set off) घेण्याची मुभा मिळेल.
(कृपया दिनांक २१-८-२०१४ ची अधिसूचना आणि आयुक्तांचे दिनांक २०-९-२०१४ चे परिपत्रक क्र 17T वाचा)